नवी दिल्ली – प्रेषितांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या एका शिंप्याची तालिबानी पद्धतीने भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या टेलरला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्याची तक्रार त्याने पोलिसांतही केली होती. पण मंगळवारी भरदिवसा त्यांची त्यांच्या दुकानात शिरुन निघृण हत्या करण्यात आली. २ हल्लेखोरांनी तलवारीने त्यांच्यावर अनेक वार केले. एवढेच नाही तर त्यांचा गळाही चिरला. या संपूर्ण घटनेचा एक VIDEO व्हायरल झाला आहे. राजस्थानच्या उदयपूरची ही घटना आहे.
हल्लेखोरांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली आहे. या दोघांच्याही पोलिसांनी सायंकाळी ७ च्या सुमारास मुसक्या आवळल्या. रियाज अंसारी व मोहम्मद गौस अशी त्यांची नावे आहेत.
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून २ हल्लेखोर आले. त्यांनी माप देण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कन्हैयालाल याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यांनी काही क्षणांतच त्यांच्यावर अर्धा डझनहून अधिक वार केले. त्यामुळे कन्हैयालाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर पसार झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धानमंडीसह घंटाघर व सूरजपोल ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस अधिकारी व एफएसएलचे पथकही घटनास्थळी पोहोचले. राज्याचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पोलिस अधीक्षकांकडून घटनेचा आढावा घेऊन हल्लेखोरांना जेरबंद करण्याची मागणी केली.