बालटाल : बाबा अमरनाथची यात्रा (Baba Amarnath Yatra) उद्यापासून म्हणजे 1 जुलैपासून सुरु होते आहे. पवित्र गुहेच्या दिशेनं अमरनाथ यात्रेकरुंची पहिली टीम शुक्रवारी सकाळी जम्मूतून रवाना झाली. पहाटे साडे चार वाजता पूजा आटोपल्यानंतर, उपराज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत पहिली टीम रवाना झाली. भोले शंकराच्या जयघोषानं जम्मू निनादलं. ही यात्रा 62 दिवस चालणार आहे. यावर्षी अधिक महिना असल्यानं कालावधी 62 दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी 2189 यात्रेकरुंना बालटाल रस्त्यावरुन प्रवासाचं टोकन देण्यात आलंय.
बालटालवरुन प्रवास सोपा, 10 किमी मोठा रस्ता
बालटाल परिसरातील लहान रस्ता आता चांगला विकसीत करण्यात आलेला आहे. 16 किमी असलेल्या या रस्त्यावर 11 किमी परिसरात रस्ता तयार करण्यात येतोय. अद्याप 5 किमी रस्त्याचं काम अजून सुरु झालेलं नाही. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी मोठी व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. 29 जूनपासून वातावरण बदलण्यासही सुरुवात झालीय. पहिल्या फळीतल्या प्रवाशांचं स्वागत पाऊस करण्याची शक्यता आहे.
सिमपासून ते गरम कपड्यांपर्यंत सर्व उपलब्ध
यात्रेकरु या प्रवासात असले तरी 300 ते 350 रुपयांत ते महिनाभराचं सिम खरेदी करु शकणार आहेत. लंगरच्या आसपास गरम कपडे आणि ट्रेकिंगचं सामानही यात्रेकरु खरेदी करु शकणार आहेत. रेनकोट, छत्र्याही विकत घेता येतील. वस्तीसाठी 500 रुपयांत टेन्टही मिळतायेत.
3 मीटर बर्फ हटवून लंगर आणि टेन्ट
यात्रेच्या मार्गावर 10 जूनपासून लंगर आणि टेन्टचं काम सुरु करण्यात आलं होतं. 3 मीटर बर्फ बाजूला करुन या ठिकाणी लंगर उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी बालटाल ते गुहेपर्यंत 16 किमी अंतरात लंगर उभारण्यात आले होते. मात्र ढगफुटी झाल्यानं अपघात घडला होता. त्यामुळं यावर्षी बालटाल ते संगम इतक्यात अंतरात लंगरची परवानगी देण्यात आलेली आहे. संगम ते गुहा या 4 किमीच्या अंतरात लंगर उभारण्यात आलेले नाहीत.
तंबाखूला यात्रेत बंदी
यावेळी यात्रेत प्रत्येक ठिकाणी तंबाखू उत्पादनांना आणि जंक आणि फ्राईड फूडवर बंदी घालण्यात आलेली आहे. दोन्ही रस्त्यांवर एकूण 120 लंगर आहेत. अडीच किमी धोकादायक असलेल्या रस्त्यावर यात्रेकरुंना हेल्मेट अनिवार्य करण्यात आलंय. हेल्मेट मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
यात्रेकरुंना प्रवासासाठी यायचं असेल तर श्रीनगर येथे येऊन 98 किमी अंतरावर असलेल्या बेस कँप बालटाल येथे पोहचावं लागणार आहे. तातडीची नोंदणी जम्मूत सुरु करण्यात आलेली आहे.