फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर तसेच मलकापूर तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गुरुवारी (दि. १) रात्री शेगाव तालुक्यातील मडाळखेड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडली. त्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील पशुपालक शेतकरी गजानन हिप्परकार यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला चढवत ४ लहान व १ मोठी अशा एकूण ५ बकऱ्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे.
या घटनेची माहिती काकणवाडा येथील पोलिस पाटील किरण इंगळे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनपाल एस. एस. सावळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक जी. एस. साकळे, वनसेवक अमोल शेकोकार व गणेश तराळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हिंस्र प्राण्याच्या पावलांच्या ठशांचे नमुने घेतले. प्राथमिक तपासात हल्ला करणारा प्राणी बिबट्याच असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्या रब्बी हंगामासाठी गहू, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी सुरू असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी रात्रीच नव्हे तर दिवसा देखील शेतात जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीकामात मोठ्या प्रमाणावर खोळंबा निर्माण झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत या बिबट्याने कोणत्याही व्यक्तीवर थेट हल्ला केलेला नाही किंवा शेतीचे नुकसान केलेले नाही. तरीही अचानक शेतात किंवा वस्तीच्या आसपास दिसणाऱ्या बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनामिक भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव, वाघोळा चिंचोल तसेच म्हैसवाडी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या भागांतील शेतकरी व ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहेत. वनविभाग व पोलिस प्रशासनाने नागरिकांना रात्री एकटे शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






