नवी दिल्ली – २ वर्षांनंतर सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेदरम्यान लंगरमध्ये फ्राइड फूड, जंक फूड, स्वीट डिश, चिप्स, समोशासारखे आरोग्यदायक नसणारे पदार्थ मिळणार नाहीत. अशा डझनभर पदार्थांवर बंदी घातली आहे. देवस्थान मंडळाने सर्व लंगर समित्यांना पत्र लिहिले की, यात्रेकरूंना पालेभाज्या, सॅलड, मक्याची रोटी, डाळ, कमी फॅटचे दूध आणि दह्यासारखे पौष्टिक पदार्थ दिले जावेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या या निर्णयात नमूद केले की, आरोग्यदायी पदार्थ प्रवाशांच्या आरोग्यासाठी उत्तम राहतील. शरीरातील ऊर्जा पातळी योग्य राहील. यामुळे यात्रेत अडचण होणार नाही. यंदाच्या यात्रेसाठी ७ लाखांहून जास्त यात्रेकरू येतील, असा अंदाज आहे. २०१९ मध्ये ३.५ लाख भाविक आले होते.
यावर बंदी… मांसाहार,मद्य, तंबाखू आणि गुटख्यावर बंदी राहील. मात्र, या वेळी हेवी पुलाव, फ्राइड राइस, पुरी, भटुरा, पिझ्झा, बर्गर,तळलेले पराठे, डोसा, तळलेली रोटी, ब्रेड बटर, लोणचे, चटणी, पापड, नूडल्स, कोल्ड ड्रिंक, हलवा, जिलेबी, चिप्स,मठ्ठी,नमकीन, पकोडा, समोसा, फ्राइड ड्राय फूड आणि डीप फ्राइड पदार्थ मिळणार नाहीत.