नवी दिल्ली : जिगोलो (Gigolo) बनवतो असं सांगू नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे. अशा टोळ्या देशभरात कार्यरत असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्यांना ही टोळी टार्गेट करीत असे. जिगिलो (Gigolo Service) करतो, असं सांगून अनेक तरुणांकडून या टोळीनं लक्षावधी रुपयेही उकळले असल्याची माहिती आहे. आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतरही पीडित तरुण समाजाच्या भीतीनं समोर येण्यास कुचराई करत असल्याचं दिसतंय. लाज वाटत असल्यानं हे तरुण या आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत, असंही समोर आलंय. दिल्लीतील सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जयपूरमधील रहिवासी असलेले्या कुलदीपसिंह चरण आणि श्यामलाल यांना अटक केली आहे.
कसे करत होते ट्रॅप
आरोपींमधील कुलदीप हा सराईत इंग्रजी बोलणारा आहे. तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी तो फोनवर परदेशातील महिलेच्या आवाजात त्यांच्याशी संभाषण साधीत असे. पोलिसांनी या टोळीकडून 4 स्मार्ट फोन, एक लॅपटॉप, एक डेस्क टॉप, 21 एटीएम कार्ड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. यासोबतच 11 बँकेत असलेली त्यांची खातीही गोठवण्यात आलेली आहेत. कुलदीप हा काही हॉटेलांमध्ये रुम बॉयची नोकरी करीत होता. तर बीए बीएड असलेला दुसरा आरोपोी शाम हा रिसेप्शनवर काम करीत होता.
तरुणांना किती पडत होता भुर्दंड
एका पीडित तरुणाने ही टोळी कशी जाळ्यात अडकवीत असे याची कहाणीच सांगितली आहे. जॉब शोधताना हा तरुण एका वेबसाईटवर पोहचला. त्यानंतर त्याला कॉ़ल आला. नोंदणीची फी म्हणून सुरुवातीला त्याच्याकडून 2499 रुपये घेण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत इतर काही कारणं देत त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं अखेरीस या तरुणानं पोलिसांत तक्रार दाखल केली.
कसा लावला छडा
पैसे ज्या अकाऊंटला पाठवण्यात आले होते, त्याचा तपास पोलिसांनी केला. त्यानंतर कुलदीपसिंहला जयपुरातून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याचा दुसरा साथीदारही पोलिसांना गवसला. या आरोपींनी चौकशीत 2017 पासून आत्तापर्यंत 4 हजारांच्यावर तरुणांना प्ले बॉय सर्व्हिस, जिगोलो सर्व्हिस देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं आता समोर आलं आहे. पैसे मागवण्यासाठी ही टोळी सुमारे डझनभर वेगवेगळ्या खात्यांचा उपयोग करीत असे.