सवलत पास असूनही फास्टॅग खात्यातून पैसे कट; गणेशक्तांची टोलमाफी फसवी?(File Photo : Toll)
सिंधुदुर्ग : राज्यभरातून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य शासनाने टोलमाफीची घोषणा केली. टोल माफीसाठी पासेसही वितरीत केले. पण, ही टोलमाफी फसवी असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. चाकरमान्यांची वाहने टोल वरून गेल्यानंतर काही क्षणात त्यांच्या खात्यामधून टोलची रक्कम वजा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पुण्यातील धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे-विश्रांतवाडी पोलिस चौकीमधून टोल माफीचा पास देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याने या पासची नोंद करून घेतली आणि पथकर माफीचा पास वितरित केला. टोलमाफीचा पास परवाना मिळवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली. कुठून कुठेपर्यंत प्रवास करणार, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रवास करणार, याबाबतची इत्यंभूत माहिती या अधिकाऱ्याने नोंदवून घेतली. दरम्यान, हा पथकर माफीचा पास घेऊन त्यांनी पुण्याहून सावंतवाडी गाठली.
दरम्यानच्या तीन टोलवर त्यांनी आपला टोलमाफीचा पास दाखवला असता त्यांनी टोलनाक्यावरून जाण्याची परवानगी दिली. मात्र, त्यांची कार टोलवरून पास झाल्यानंतर ते चहापानासाठी थांबले असता तिन्ही टोलवाल्यांनी आपली रक्कम काही अंतराने डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. फक्त प्रसिद्धीसाठी राज्यकर्त्यांकडून गणेशभक्त चाकरमान्यांसाठी टोलमाफीची घोषणा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात ही टोल माफी चाकरमान्यांना मिळत नाही. उलट त्यांना टोल द्यावा, असा अनुभव येत आहे.
तीन टोलनाक्यांचे 282 रुपये वजा
सुरुवातीला त्यांना खेड शिवापूर टोल, आणेवाडी, तसवडे टोलनाक्यावरून ते अनुस्कुरा घाटातून कोकणात दाखल झाले. टोलमाफी असल्यामुळे ते आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले. मात्र, सुरुवातीला मिळालेल्या खेड शिवापूर टोल नाक्याचे १२५ रुपये त्यांच्या खात्यातून डेबिट झाले. तसा मेसेज त्यांना आला.
त्यानंतर आणेवाडीच्या टोल नाक्यामधून ८५ रुपये डेबिट झाले. तासवडे टोलनाक्याचे ७५ रुपये असे मिळून एकूण २८५ रुपये त्यांच्या खात्यामधून डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. अशाप्रकारे अनेक जणांना टोलची रक्कम त्यांच्या खात्यात डेबिट झाली.