मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर...
भंडारा : दारूच्या नशेत धुंद होऊन घरासमोर अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला अडवले. त्यानंतर संतापलेल्या त्या तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २५) रात्री आठच्या सुमारास ओपारा गावात घडली. याप्रकरणी जखमी प्रमिला मेश्राम (वय ४२, रा. ओपारा) यांच्या तक्रारीवरून आरोपी विनोद उर्फ पिंटू लांजेवार (रा. ओपारा) याच्याविरुद्ध लाखांदूर पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.
घटनेच्या दिवशी फिर्यादी प्रमिला मेश्राम ही मुलगा समीर व इतर कुटुंबीयांसोबत घराच्या परिसरात होती. त्याचवेळी आरोपी विनोद लांजेवार हा दारूच्या नशेत घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करू लागला. समीर मेश्राम याने त्याला अडविल्यावर आरोपीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. प्रमिला मेश्राम यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. हे पाहून संदीप मेश्राम याने भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यावरही आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केला.
हेदेखील वाचा : मी तुझी सवत बोलतेय…, हे शब्द ऐकताच महिलेला आली उचकी आणि चालत्या बसमध्येच सोडला जीव; काय घडलं नेमकं?
दरम्यान, या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, समीर व संदीप हे गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे हलविण्यात आले आहे. फिर्यादी प्रमिला मेश्राम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष गंद्रे करीत आहेत.
पुण्यात हॉटेल व्यावसायिकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात किचनमधला चाकू आणत तो अचानक एकाच्या पोटात खुपसून व वार करून खून केला. बेसावध असल्याचे पाहून आरोपीने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.