तामिळनाडू निवडणुकीत भाजपला किती फायदा होणार? काय म्हणाले अमित शहा? (फोटो सौजन्य-X)
AIADMK-BJP Alliance News : तामिळनाडूच्या राजकारणात मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना पदावरून काढून टाकल्यानंतर लगेचच राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष अण्णाद्रमुक (AIADMK) ने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये परतण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राज्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, तर राष्ट्रीय पातळीवर युतीचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. तसेच तामिळनाडूचा मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांच्यात युती झाली आहे. दोन्ही पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका माजी मुख्यमंत्री एडाप्पाडी के पलानीस्वामी (ईपीएस) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र लढवतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चेन्नई येथे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.
यावेळी अमित शहा यांनी सांगितले की, १९९८ पासून जयललिता आणि अटलजींच्या काळात, आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. एक काळ असा होता, जेव्हा आम्ही लोकसभेच्या ३९ पैकी ३० जागा एकत्रितपणे जिंकल्या होत्या. भाजप आणि अण्णाद्रमुकमधील युती केवळ राजकीय नव्हती तर ती विश्वास आणि विचारसरणीवर आधारित होती. शाह यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंधांची आठवण करून दिली आणि सांगितले की दोन्ही नेत्यांनी नेहमीच तामिळनाडूच्या विकासासाठी एकत्र काम केले आहे.
तसेच शाह यांनी स्पष्ट केले की, भाजप सरकारमध्ये सहभागी होईल की नाही हे निवडणुकीनंतर ठरवेल. अण्णाद्रमुकने कोणतीही मागणी केलेली नाही आणि भाजपकडून त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. ही युती दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त आहे आणि आम्ही एकत्र निवडणुका लढवू. मंत्र्यांची संख्या आणि जागावाटपाबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. सध्या, एनडीएचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील भ्रष्ट द्रमुक सरकारला हटवणे आहे.
शहा यांनी द्रमुकवर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की, द्रमुक जाणूनबुजून सनातन धर्म आणि भाषेसारखे मुद्दे उपस्थित करत आहे. जेणेकरून ते लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून विचलित करू शकेल. तामिळनाडूच्या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा भ्रष्टाचार असेल आणि यावेळी लोक विकास आणि पारदर्शकता निवडतील. अटलबिहारी वाजपेयी आणि जयललिता यांच्या काळात अस्तित्वात असलेल्या युतीची आठवण करून देताना ते म्हणाले की, भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्रितपणे भूतकाळातही मोठे यश मिळवले आहे. यावेळीही जनता एनडीएला बहुमत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे आणि द्रमुक सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शाह म्हणाले की, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने आतापर्यंत सुमारे ३९,००० कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत, ज्यामध्ये दारू घोटाळा आणि मनरेगा घोटाळा हे प्रमुख आहेत. आम्ही द्रमुक सरकारचे घोटाळे उघड करू. या भ्रष्टाचारासाठी तामिळनाडूचे लोक स्टॅलिन आणि उदयनिधी यांना कधीही माफ करणार नाहीत.






