(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dasami Marathi Movie: विजयादशमी म्हणजे अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा संदेश देणारा दिवस. याच विजय, शक्ती आणि परिवर्तनाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’च्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ‘प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी दशमी’ हा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेता रवि प्रकाश यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले यांनी ‘दशमी’च्या संकल्पनेबद्दल सांगितले की, हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या धैर्याचा आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे.
विजयादशमीच्या संकल्पनेला आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ राहणारा अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले.
‘दशमी’मध्ये भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटाची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली असून, कथानकातील धागेदोरे सहज उलगडणार नाहीत.
कथेच्या प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न, अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक खुलासे पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ‘दशमी’ हा सस्पेन्स-क्राईम थ्रिलर म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
चित्रपटाच्या लेखन आणि संगीताची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. मोठ्या पडद्यावर एक वेगळा आणि सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न ‘दशमी’च्या टीमने केला आहे.






