संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

छत्तीसगडमधील कांकेरमध्ये झालेल्या मोठ्या चकमकनंतर नक्षलवाद्यांमध्ये दहशत पसरली आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपा नेत्याची गळा चिरून हत्या केली. पंचमदास माणिकपुरी असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

    रायपूर : छत्तीसगडमधील कांकेरमध्ये झालेल्या मोठ्या चकमकनंतर नक्षलवाद्यांमध्ये दहशत पसरली आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपा नेत्याची गळा चिरून हत्या केली. पंचमदास माणिकपुरी (Panchamdas Manikpuri) असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. हे प्रकरण नारायणपूरच्या फरासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दंडवंद गावातील आहे.

    भाजप नेत्याच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक पत्रकही फेकले, ज्यामध्ये भाजप नेत्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार इशारा देऊनही त्यांनी ऐकले नसल्याने त्यांना फाशीवर लटकविण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. कांकेरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 2024 च्या सुरुवातीपासून, माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 80 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. अलीकडच्या काळात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील रणनीती बदलली आहे.

    नवीन ऑपरेशन प्रहारमध्ये सुरक्षा दलांनी पिन पॉइंटेड ऑपरेशन केले आहेत. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी दोन मोठ्या कारवाया केल्या असून, त्यात अवघ्या 15 दिवसांत 42 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवादी बॅकफूटवर असून सुरक्षा दलांचा वरचष्मा असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

    माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप, चकमक बनावट

    माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षल चकमकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या 5 वर्षांत नक्षलवाद्यांविरोधात प्रभावी कारवाई केली आहे. भाजपच्या राजवटीत अनेक खोट्या चकमकी झाल्या आहेत. ज्या आमच्या राजवटीत घडल्या नाहीत. आदिवासींना अटक करू, अशी धमकी दिली जात आहे.