मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर
महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यांतर्गत विकासकामांचे अनावरण
गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन
कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्राचीन, जागृत आणि प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. सुमारे हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेल्या या मंदिराचा उल्लेख विविध पुराणे आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा अद्वितीय संगम असलेले हे मंदिर देश-विदेशातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंजूर केलेला महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला अधिक बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे.
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा 🕠 संध्या. ५.२५ वा. | २०-६-२०२६📍इचलकरंजी.@narendramodi @AmitShah#Maharashtra https://t.co/zddnPn4Mwi — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2026
मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व बाबींचा समन्वय साधत हा आराखडा राबविण्यात येत आहे. विकास आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे वैभव अधिक वृद्धिंगत होणार असून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला ६ मे २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या २८ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूळ मंदिराचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनासाठी ३२.९६ कोटी रुपये तसेच मंदिरातील विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि लाईटिंगविषयक कामांसाठी २३.०५ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. मंदिराचे पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.






