राजस्थानमध्ये 'बर्निंग बस'चा थरार; 20 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू, बस आगीत जळून खाक
जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात धावत्या एसी बसमध्ये अचानक भीषण आग लागली. धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. यातच 20 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. काही जणांनी खिडक्या तोडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेकजण यशस्वी झाले. दरम्यान, आग लागल्यानंतर बसचे दरवाजे बंद होते, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. या बसमध्ये एकूण 57 प्रवासी असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
बस अपघातात गंभीरपणे भाजलेल्या 19 प्रवाशांना जोधपूर येथे रेफर करण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जैसलमेरमध्ये चार जखमींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्थानिक पत्रकार राजेंद्र सिंह चौहान यांचाही समावेश आहे. ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात असताना एसी युनिटला अचानक आग लागली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बराच प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली.
हेदेखील वाचा : Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…
दरम्यान, यामध्ये 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अधिकृत माहिती दिली गेली नाही. या घटनेनंतर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी बुधवारी बिहारचा नियोजित दौरा रद्द केला आणि मदत आणि बचाव परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले
जोधपूरला आणलेल्या बहुतेक लोकांपैकी बहुतेक लोक ७० टक्क्यांहून अधिक भाजले होते. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर होती. मुख्यमंत्री कार्यालयाने येथे अनेक मृत्यूंची अनधिकृतपणे नोंद केली आहे. गंभीर परिस्थिती पाहता मृतांचा आकडा ३५ पर्यंत पोहोचू शकतो. या बसमध्ये एक लष्करी जवान महेंद्र, त्याची पत्नी आणि दोन मुली देखील असल्याचे वृत्त आहे. महेंद्र जैसलमेरमधील दारूगोळा डेपोमध्ये तैनात होते.
पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘जैसलमेरमधील अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दुःखी आहे. आम्ही यातील बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.