संग्रहित फोटो
नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा ४३ जागांसह अग्रस्थानी राहिला, तर महायुतीमधीलच शिवसेना शिंदे गटाला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ जागा मिळाली. त्यामुळे ४७ जागांसह सत्तेची सूत्रे भाजपाच्या हाती आली आहेत.
ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्यांमध्ये योगेश पाटील, सतिश मुळीक, प्रदीप धोत्रे, नितेश पोवार, राजू पुजारी, सुशांत कलागते, किरण खवरे, प्रमिला जावळे, रुपा बुगड, ध्रुवती दळवाई, विद्या साळुंखे, रुपाली सातपुते, सपना भिसे आणि पुनम माळी यांचा समावेश आहे. तर ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेल्यांमध्ये भाजपमधील तानाजी पोवार, जुलेखा पटेकरी, विठ्ठल चोपडे, उदय धातुडे, सारीका पाटील, अभिषेक वाळवेकर, ओंकार सुर्वे, मनिषा कुपटे, मोनाली मांजरे, वैशाली मोहिते, शशिकला कवडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सरीता आवळे यांचा समावेश आहे.
निकटवर्तीयासह अनुभवी शर्यतीत
ओबीसी प्रवर्गातून विजयी सदस्यांमध्ये नवख्यांची संख्या जास्त आहे. तर पडताळणी प्रमाणपत्र असलेल्यांपैकी तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सरिता आवळे अनुभवी सदस्य असून, यामध्ये अभ्यासू म्हणून विठ्ठल चोपडे यांना संधी मिळू शकेल. नवोदित सदस्यांचा विचार झाल्यास प्रामुख्याने नितेश पोवार, सतिश मुळीक या आमदार राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांच्या नावाची चर्चा होईल. नितेश पोवार यांनी प्रभाग १२ मध्ये दोन माजी उपनगराध्यक्षांना पराभूत करण्यासह सहकाऱ्यांच्या मदतीने भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात यश मिळविले आहे. शिवाय तरुण उद्योजक अभिषेक वाळवेकर, रुपा बुगड, सपना मिसे, उदय धातुंडे, सुशांत कलागते यांचाही विचार होऊ शकतो.
नेत्यांची कृपादृष्टी कोणावर पडणार?
ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या सदस्यांची संख्या १४ तर इतर प्रवर्गातून विजयी झालेले पण ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेले १३ सदस्य आहेत. त्यामुळे या २७ जणांमधून कोणाची लॉटरी निघणार याकडे लक्ष लागले आहे. शिवाय तिन्ही नेत्यांची कृपादृष्टी यापैकी कोणावर पडणार आणि पहिल्या महानगरपालिकेचा पहिला महापौर बनण्याचा मानकरी कोण ठरणार? या चर्चेला रंग चढू लागला आहे.
१४ सदस्यांना महापौर पदाची संधी
पहिले महापौरपद ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या प्रवर्गातून कमळ चिन्हावर विजयी झालेल्या ८ महिला आणि ६ पुरुष अशा १४ सदस्यांना महापौर पदाची संधी आहे. परंतु अन्य प्रवर्गातून विजयी होऊनही ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र असलेले १३ सदस्यही महापौरच्या शर्यतीत आल्याने महायुतीकडील संख्या २७ झाली आहे.






