नवी दिल्ली : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जगातील 500 श्रीमंतांच्या यादीतून हे समोर आले आहे. त्यानुसार, 5 जानेवारी 2024 रोजी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती US $ 97.0 अब्ज नोंदवली गेली. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती US $ 97.60 अब्ज झाली.
या यादीत गौतम अदानी 12 व्या तर मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट पुन्हा एकदा टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांच्या नावावर राहिला. त्यांची एकूण संपत्ती $220 अब्ज इतकी नोंदवली गेली. टॉप 10 श्रीमंतांमध्ये नऊ जण अमेरिकेतील आहेत आणि त्यापैकी बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख आहेत.
जगातील प्रसिद्ध व्यक्तींची क्रमवारी
या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स चौथ्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती 138 अब्ज डॉलर आहे. त्याचप्रमाणे, फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी 138 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. वॉरेन बफे $१२२ अब्ज संपत्तीसह आठव्या स्थानावर राहिले. अली बाबाचे जॅक मा $29 अब्ज एकूण संपत्तीसह 50 व्या क्रमांकावर होते.
टॉप 50 मध्ये फक्त चार भारतीयांना स्थान
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या या यादीत केवळ चार जणांना टॉप 50 मध्ये स्थान मिळवण्यात यश आले. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याशिवाय शापूर मिस्त्री 38 व्या क्रमांकावर होते. त्यांची एकूण संपत्ती $34.6 अब्ज होती. याशिवाय शिव नाडर 45 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ३३ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली.






