cbi raid
गुजरात : नीट पेपर लीक (NEET Paper leak case) प्रकरणी सीबीआयने गुजरातमधील चार जिल्ह्यांसह सात ठिकाणी छापेमारी केल्याची बातमी समोर आली आहे. सीबीआयने आज (२९ जून) सकाळपासून गोध्रा, खेडा, आनंद आणि अहमदाबादसह सात ठिकाणी छापे टाकत कारवाई केल्याची बातमी आहे. NEET पेपर लीकशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत.
दरम्यान हजारीबाग येथील पत्रकार जमालुद्दीन यालाही सीबीआयने अटक केली होती. जमालुद्दीनवर प्राचार्य आणि उपमुख्याध्यापकांना मदत केल्याचा आरोप आहे. जमालुद्दीन हा फोनद्वारे प्राचार्यांशी सतत संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पेपर लीक प्रकरणात तो प्राचार्य आणि उपमुख्याध्यापकांना मदत करत असल्याची माहिती त्याच्या कॉल डिटेल्स आणि सीबीआयच्या तपासातून समोर आली आहेत.
NEET-UG पेपर लीक प्रकरणी सीबीआयने झारखंडमधील हजारीबाग येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांना शुक्रवारी अटक केली होती. ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसानुल हक यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे 5 मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी हजारीबागचे शहर समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उपप्राचार्य इम्तियाज आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि ओएसिस शाळेचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पेपर लीक प्रकरणी सीबीआय जिल्ह्यातील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे.
सीबीआयने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-ग्रॅज्युएट (NEET-UG) पेपर लीक प्रकरणात सहा एफआयआर नोंदवले आहेत. NTA ने देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET-UG परीक्षा आयोजित केली होती. यंदा 5 मे रोजी एकूण 571 शहरांतील 4 हजार 750 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते.
दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर NEET पेपर लीक प्रकरणात लातूर आणि बीडमधील आणखी काही शिक्षक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संदर्भात लातूर पोलिसांनी बीड येथील दोन शिक्षकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या त्याला नोटीस दिल्यानंतर सोडून देण्यात आले असले तरी तो अद्याप संशयाच्या भोवऱ्यात आहे. NEET परीक्षेत 650 पेक्षा जास्त गुण मिळवण्याच्या बदल्यात आरोपीने प्रति विद्यार्थी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र सुरुवातीला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून घेण्यात आले. 14 पैकी एकाही विद्यार्थ्याला 600 पेक्षा जास्त गुण मिळाले नसल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे काही रक्कमही परत झाली.