नवी दिल्ली : विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) दहावी आणि बारावीच्या परीक्षा आज (बुधवारपासून 15 फेब्रुवारी) सुरू होत आहे. परीक्षेआधी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे, यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही. आजपासून CBSE बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येईल. त्यामुळं विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाची जोरदार तयारी केली आहे. (CBSE Board Exams 2023)
38 लाख विद्यार्थी तर 7200 केंद्रांवर परीक्षा
दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला एकूण 21.8 लाख विद्यार्थी आणि 16.9 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 7200 केंद्रांवर आणि जगभरातील 26 केंद्रांवर सीबीएसई परीक्षा घेण्यात येणार आहेत.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
प्रवेशपत्रावर दिलेलं नियम नीट वाचा आणि त्यांचं पालन करणं सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असणार आहे. केंद्राकडून परवानगी असलेलं स्टेशनरी साहित्य (Stationery) परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत नेऊ नका. सकाळी 10 वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे परीक्षेला वेळेवर जा. वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचा. शालेय गणवेश आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावं. तसेच विद्यार्थ्याकडे सीबीएसईचं प्रवेशपत्र (Hall Ticket) असावं. कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.