ई वाहनांचा (E -vehicle) वापर लोकांमध्ये वाढला असला तरी या वाहनांच्या बाबतीत अनेक तक्रारी समोर येत असतात. त्यापैकीच एक तक्रार म्हणजे या ई वाहनांना अजिबात आवाज नसणे. ई वाहने पर्यावरणपूरक (Eco-friendly vehicle) असल्यामुळे ही वाहनं चालवताना अजिबात आवाज येत नाही. मात्र यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. इतर वाहन चालकांना व पादचारी लोकांना ई वाहने आल्याचे लक्षात येत नाही. मात्र यावर आता उपाय म्हणून या ई वाहनांचा आवाज वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) देखील याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
ई वाहनांचा आवाज वाढवला जाणार असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना मथाई म्हणाल्या, इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज इतर वाहनांसारखा होत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांत पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ई-वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲकॉस्टिक व्हॉईस अलर्ट सिस्टीम (एव्हीएएस) बसवण्याची शिफारस करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत नियमावली तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे असे डॉ. रेजी मथाई यांनी सांगितले.
ई वाहनांमध्ये एव्हीएएस सिस्टीम बसवल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या सिस्टीममुळे ई-वाहन 20 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने धावत असताना देखील आवाज होतो. हा आवाज कमी तीव्रतेचा आणि पाच फुटांच्या अंतरातील पादचाऱ्यांना ऐकू येणारा असतो. इंजिनाचा आवाज होतो तसाच हा आवाज असतो. ई-वाहन सुरू केल्यानंतर तातडीने ही यंत्रणा सुरू होते आणि वाहन बंद केल्यानंतर ही यंत्रणाही बंद होते. मागच्या वर्षी मारूती सुझुकीने काही ई-मोटारींमध्ये ट्रायल बेसिसवर वापर सुरू केला.