चंपई सोरेन आज घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मध्यरात्री घेतली राज्यपालांची भेट

विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन (Chanpai Soren) यांनी गुरुवारी रात्री राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी पत्र दिले. राज्यपालांनी त्यांचे पत्र स्वीकारून शपथविधीची परवानगी दिल्याची माहिती आहे.

    रांची : विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन (Chanpai Soren) यांनी गुरुवारी रात्री राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी पत्र दिले. राज्यपालांनी त्यांचे पत्र स्वीकारून शपथविधीची परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी चंपई मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

    चंपई यांच्यासोबत किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप निश्चित नाही. विशेष असे की, चंपई यांना 10 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांनी शुक्रवारीच शपथ घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना गुरुवारी सकाळी ईडीने कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची रांचीतील होटवार कारागृहात रवानगी करण्यात आली.

    तसेच ईडीने केलेल्या अटकेविरोधात सोरेन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावर शुक्रवारी (दि.2) सुनावणी घेण्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मान्य केले.

    विमान धुक्यामुळे रद्द

    आमदारांची फोडाफोडी होण्याच्या भीतीने चंपई सोरेन यांची तारांबळ उडाली होती. काँग्रेस नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर 43 आमदारांना हैदराबादमध्ये चार्टर विमानाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदारांना घेऊन चंपई विमानतळावर पोहोचले. मात्र, धुक्यासह खराब हवामानामुळे विमानच उडू शकले नाही. विमान रद्द झाल्यामुळे अखेरीस चंपई सर्व आमदारांना घेऊन पुन्हा सर्किट हाऊसमध्ये माघारी परतले.