पुणे रेल्वे स्टेशन (फोटो- सोशल मीडिया)
पुणे स्थानकावरील हमाल दरांमध्ये वाढ
प्रशासनाने जारी केले नवे दर
प्रवाशांना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार
पुणे: इंधन दरवाढ,तिकीट खर्च आणि रोजच्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत असताना,आता पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरील कुलींच्या (हमाल) दरांमध्ये वाढ केली असून,नवे दर लागू केले आहेत.त्यामुळे आता स्थानकावर सामान वाहून नेण्यासाठी प्रवाशांना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार असून प्रवास अधिक खर्चिक ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन अधिकृत दरांनुसार,आता डोक्यावरून ३७ ते ४० किलोपर्यंत सामान वाहून नेण्यासाठी प्रवाशांना १०० रुपये द्यावे लागतील. तसेच, १६० किलोपर्यंत वजन वाहून नेणाऱ्या दोन चाकी हातगाडी आणि चार चाकी हातगाडीच्या सेवेसाठी प्रत्येकी १५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.याशिवाय,आजारी किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम प्रवाशांना स्ट्रेचर किंवा खुर्चीद्वारे नेण्यासाठी दोन कुलींच्या सेवेकरिता १५० रुपये,तर चार कुलींच्या मदतीने सेवा घेतल्यास २०० रुपये मोजावे लागणार आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या सुमारे १६० कुली कार्यरत असून,प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे पोहोचवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.सध्याची वाढती महागाई, श्रमाचे स्वरूप आणि कुलींची आर्थिक गरज लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अधिकृत दरांपेक्षा जास्त पैसे मागणाऱ्या कुलींवर थेट निलंबनासह कडक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचा आता विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही लवकरच मिळणार
पुणे रेल्वे स्थानकाचा आता विस्तार होणार
वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी नवीन सहा प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. आता या कामाला गती येताना दिसत आहे. पीएच-५३ अंतर्गत एकूण ४४ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यामुळे पुणे स्टेशनवर नव्या आयलंड प्लॅटफॉर्मसह आवश्यक सोयी-सुविधा उभारणीच्या कामाला गती येताना दिसून येत आहे.
या योजनेत प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व ८ साठी १० कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत ६५० मीटर लांबीचा व १० मीटर रुंदीचा आयलंड प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. यामुळे या भागातील गाड्यांची हाताळणी अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ९ व १० साठी १८ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये ७५० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा प्लॅटफॉर्म उभारण्याबरोबरच ४०० मीटर सीओपी, दोन स्वच्छतागृह ब्लॉक आणि १० पाणी स्टँड उभारले जाणार आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळणार आहे.






