File Photo : Landslide
गुवाहाटी : अरूणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये रविवारी ढगफुटीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे परिसरात लोकांना तिथे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग-415 वर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली आहेत.
त्यातच आसाममध्ये जवळपास आठवडाभरापासून पाऊस पडत 19 जिल्ह्यांतील सुमारे 4 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. पूरग्रस्तांसाठी सरकारने 100 मदत छावण्या उभारल्या आहेत. मदत सामग्री पुरविण्यासाठी 125 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
हवामान विभागाने 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील माळवा क्षेत्राव्यतिरिक्त गोवा, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.






