सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून न्यायालयाने गुरुवारी माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात जणांची निर्दोष मुक्तता केली. आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, केवळ संशयाने निष्कर्ष काढता येत नाही, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे.
स्फोटात वापरलेल्या बाईकचा प्रज्ञा ठाकुर यांच्याशी संबंध सिद्ध होऊ शकला नाही. तसेच, आरडीएक्स पुरवण्यात आणि बॉम्ब बनवण्यात कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. कट सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, स्फोटाच्या निधीबद्दल काहीही पुष्टी झालेली नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्त केल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले, ‘मी एक सैनिक असून या देशावर बिनशर्त प्रेम करतो. देश नेहमीच सर्वोच्च असतो, त्याचा पाया मजबूत असावा.मी मानसिकदृष्ट्या आजारी लोकांचा बळी आहे.काही लोकांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर केला. देशाचे आणि न्यायव्यवस्थेचा आभारी आहे. संपूर्ण खटल्यात सैन्य माझ्या पाठीशी उभे राहिलं आणि मला माझ्या सैन्याबद्दल खूप आदर आहे. भूतकाळ विसरून मी आता देशाची सेवा करण्यास तयार आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पण आता प्रश्न असा आहे की कर्नल पुरोहित पुन्हा सैन्यात सक्रियपणे काम करता येईल का?
कर्नल पुरोहित यांचा खटला १७ वर्षे चालला. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा सक्रिय सेवेत घेण्यात आलं. परंतु त्यांनी बढतीच्या सर्व संधी गमावल्या. मालेगाव खटला न्यायालयात सुरू असताना, कर्नल पुरोहित यांना मुंबई किंवा जवळच्या भागात तैनात करण्यात आलं. त्यांच्या काही सहकाऱ्यांना बढती मिळाली आणि ते सैन्यात ब्रिगेडियर आणि युनिट हेडच्या पातळीवर पोहोचले, परंतु ते इतकी वर्षे लेफ्टनंट कर्नल पदावर राहिले. खटला प्रलंबित असताना, त्यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी नियमितपणे केली जात होती, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची खात्री करता येईल.
मालेगाव प्रकरणातील निकालानंतर आता कर्नल पुरोहित यांच्या पत्नी अपर्णा म्हणाल्या की, इतक्या वर्षांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. आता त्यांना जिथे पाठवलं जाईल तिथे जाण्यासाठी तयार आहे. कर्नल पुरोहित आता ५३ वर्षांचे आहेत, परंतु न्यायालयात त्यांना मदत करणारे लष्करी अधिकारी म्हणाले, ‘मनाने ते २१ वर्षांचे आहेत.’
सूत्रांनुसार, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आता लष्कर न्यायालयाच्या निर्णयाचे मूल्यांकन करेल आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे कर्नल पुरोहित यांच्या पुढील सेवेचा निर्णय घेतला जाईल.
गेल्या वर्षी, त्यांच्या वकिलामार्फत, कर्नल पुरोहित यांनी एनआयए विशेष न्यायालयात सांगितले होते की मुंबई एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते आणि त्यांचा उजवा गुडघा मोडला होता. पुरोहित यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की अधिकारी त्यांची बेकायदेशीरपणे चौकशी करत होते आणि गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्यासह आरएसएस-विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ सदस्यांची नावे घेण्यासाठी दबाव आणत होते.
कर्नल पुरोहित यांनी दावा केला की त्यांना २९ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती. एटीएसने त्यांच्या अटकेचे रेकॉर्ड दाखवले नव्हते. मुंबईत अटक झाल्यानंतर त्यांना खंडाळा येथील एका बंगल्यात नेण्यात आले, जिथे तत्कालीन एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे आणि परमबीर सिंग (तत्कालीन एटीएसचे संयुक्त आयुक्त) यांच्यासह अनेक अधिकारी त्यांची चौकशी करत होते.
कर्नल पुरोहित यांच्यावर स्फोटासाठी स्फोटके पुरवल्याचा आरोप होता. त्यांच्यावर ‘अभिनव भारत’ ला निधी देण्याचा आणि संघटनेशी संबंधित लोकांना प्रशिक्षण देण्याचाही आरोप होता. नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, कर्नल पुरोहित यांना २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मिळाला. पुरोहित यांच्यावर निवृत्त लष्करी मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह मालेगाव स्फोटांचा कट रचल्याचाही आरोप होता. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक उपाध्याय यांचीही स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.