फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अयोध्या : अयोध्येचे राम मंदिर सध्या गळतीमुळे चर्चेत आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राम मंदिराचे मोठ्या उत्साहात व दिमाखदार सोहळा करत उद्घाटन करण्यात आले. भाजपने मोठ्या उत्साहाने राम मंदिर उद्घाटन केले होते. मात्र पहिल्याच पावसामध्ये राम मंदिराला गळती लागल्याचा दावा केला जात आहे. मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिरामध्ये गळतीचा दावा केला होता. हे प्रकरण खूप चर्चेत आल्यानंतर मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पहिल्याच पावसाळ्यामध्ये गर्भगृहामध्ये पाणी गेल्याचा दावा केला होता. यावर मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी खरे कारण सांगितले आहे. नृपेंद्र मिश्र म्हणाले, मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिलं आहे. मात्र मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच बांधकाम सुरु आहे. हे यामागंच खरं कारण आहे. संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी भरलं व छतामधून गळती झाली. दुसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत छत बंद होईल. त्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार नाही” असे आश्वासन नृपेंद्र मिश्र यांनी दिले आहे.
राम मंदिरात कमतरता नाही
पुढे त्यांनी मंदिरातील गर्भगृहामध्ये साचलेल्या पाण्याबद्दल स्पष्टीकरण दिले. “मंदिराच्या गर्भगृहात स्वयंचलित पाणी काढण्याची व्यवस्था नाही. पाणी हातानेच काढाव लागतं. अन्य सर्व मंडपात उतरण आहे. पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे तिथे पाणी जमा होत नाही. राम मंदिर निर्माण समिती कोट्यवधी राम भक्तांना आश्वस्त करु इच्छिते की मंदिर निर्माणात कुठली कमतरता नाहीय. कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाही,” असे स्पष्ट मत नृपेंद्र मिश्र यांनी व्यक्त केले.