मुंबई : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने तामिळनाडू राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, काही जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून हे चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ गेल्या सहा तासांत ताशी १० किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, शुक्रवारी १२ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.