संग्रहित फोटो
पिंपरी: शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळेल असे एका व्यक्तीला आमिष दाखवून तब्बल ६३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधून समोर आली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यावरून एक कोटी १५ लाख रुपयांचा व्यवहार उघडकीस आला आहे. विविध राज्यांतून १० तक्रारीही दाखल झाल्या आहेत. प्रथमेश शिवाजी भुसे (वय २३, रा. लोहगाव, पुणे; मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिन राधाकिसन मोरे (वय ३४, रा. दिघी), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूकीची घटना १० जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली आहे. तक्रारदाराने फेसबुकवर जाहिरात पाहिली आणि त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे शेअर खरेदीस सांगितले गेले. संशयितांनी तक्रारदाराला सात कोटी ५६ लाख ९१ हजार ४६० रुपयांचा नफा झाल्याचे दाखवून फसवले.
सायबर पोलिसांनी तक्रारदाराकडून पैसे पाठवलेल्या बँक खात्याची माहिती काढली असता, मातोश्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी नावाच्या खात्याचे केवायसी प्रथमेश भुसे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रथमेशला ताब्यात घेतले असता, त्याने साथीदार सचिन मोरे यासोबत मिळून फसवणूक केल्याचे कबूल केले. संशयितांनी पैसे बँकेतून रोख स्वरूपात काढून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, या बँक खात्यावर एकूण एक कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचा व्यवहार झाला.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, तसेच पोलीस पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात महत्वाची कामगिरी बजावली. सध्या या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.
आणखी एका तरुणाची फसवणूक
राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसही वेळोवेळी करत आहेत मात्र फसवणुकीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.