कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनसह अन्य काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचं संकट ओढवलं आहे. भारतात १८ वर्षावरील नागरिकांचं बऱ्यापैकी लसीकरण झालं आहे. तर आता कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येईल.
कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत तरी लहान मुलांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र आता कोरोनाच्या नव्या एक्सई (XE Corona Varient) या वेरीएन्टमुळे अनेक चिमुरड्यांना संसर्ग होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. तसंच कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर आता शाळाही सुरु झाल्या आहेत. मास्कचा वापरही तुलनेनं कमी झाल्याचं दिसून येतंय. अशातच शाळांचं नवं वर्ष सुरु झाल्यानंतर लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अचानक वाठू नये, यासाठी वेळीच खबरदारी बाळगण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं सांगितलं जातंय. तसंच गेल्या तीन आठवड्यात मुलांमध्ये तापाची लक्षणं वाढत असल्याचंही दिसून आलेलं आहे.