गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता (File Photo : Gujrat Bridge)
वडोदरा : गुजरातमधील वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल बुधवारी (दि.9) अचानक मध्यभागी कोसळला. या दुर्दैवी घटनेत मोठी जीवितहानी झाली. यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर तीनजण अद्यापही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. यातील बेपत्ता झालेल्यांचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.
गंभीरा पूल 1981 मध्ये बांधण्यात आला होता. 1985 मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु, कालांतराने पूल जीर्ण होऊ लागला. स्थानिक आमदार चैतन्य सिंह झाला यांनी या पुलाबद्दल आधीच इशारा दिला होता आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. असे असूनही, पुलावरून वाहनांची वाहतूक थांबली नाही. आता सरकारने 212 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे आणि त्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Monsoon Rain Alert: पुढच्या 24 ते 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, उत्तर भारतात बिघडणार स्थिती; उडणार हाहाःकार
दरम्यान, या पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. वडोदराच्या भागात अनेक वाहने पुलावरून जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जीवितहानीसह काही वित्तहानी देखील झाली आहे.
एनडीआरएफ-एसडीआरएफ सतत बचावकार्य
वडोदराचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ‘आणखी 3 मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे मृतांची संख्या 15 झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळापासून सुमारे 4 किमी खाली शोधमोहीम राबवत आहेत. अपघाताच्या वेळी, दोन वाहने पुलासोबत खाली पडली आणि आता ती चिखलात अडकली आहेत. त्या वाहनांची माहिती गोळा करण्यासाठी स्थानिक लोकांशीही संपर्क साधला जात आहे’.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, घटनास्थळी पुलावरून एक रिकामा टँकर लटकत होता. त्याच्या खाली बचावकार्य सुरू आहे, त्यामुळे ते हलवणे धोकादायक असू शकते. मदत कार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून टँकर स्थिर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोध आणि बचाव कार्यात अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.
दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरु
प्रशासन आणि मदत संस्थांचे अधिकारी घटनास्थळी सातत्याने हजर राहत आहेत. प्रत्येक स्तरावर बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांनी दुसऱ्या दिवशीही संपूर्ण परिसरात शोध आणि मदतकार्य सुरू ठेवले. बेपत्ता लोकांना लवकरात लवकर शोधता यावे यासाठी स्थानिक लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.