नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून गायब होते त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरले होते. कथित जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून त्यांची मोठी चौकशी करण्यात आली. अखेर ईडीच्या अनेक दिवसांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी हायव्होलटेज ड्राम्यानंतर सोरेन यांना ईडीनं अटक केली होती.
सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच
ईडीच्या अटकेविरोधात हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांना न्या. संजीव खन्ना, न्या. एमएम सुंदरेश आणि न्या. बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
चंपाई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. यावेळी काँग्रेसचे आमदार अल्गीर आलम आणि आरजेडीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. चंपाई सोरेन यांनीही शुक्रवारी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हैदराबादला पाठवण्याची तयारी सुरू आहे.
सरकार स्थापनेसाठी आमंत्रित
राज्यपालांनी चंपायी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. याशिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. राज्यपालांच्या निमंत्रणाआधीच चंपाई सोरेन यांनी त्यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. आपल्याला ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा चंपाई सोरेन यांनी केला आहे.