भारत-पाक तणाव अन् अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, सोन्याच्या दरांवर होणार परिणाम (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. यातच आता भारत-पाक तणावाचा विमानसेवेलाही मोठा फटका बसला आहे. त्यात भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव आणखीन वाढला आहे. याचा आता सोन्याच्या दरांवर परिणाम होताना दिसत आहे.
सोने-चांदीचे दर जीएसटीसह एक लाख रुपयांहून अधिक झाले होते. मात्र, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या घोषणेमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. गुरुवारी (दि.8) संध्याकाळी सोन्याच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली. ट्रम्प यांनी लवकरच ब्रिटनसोबत मोठा व्यापार करार करण्याची शक्यता वर्तवल्याने जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला.
दरम्यान, जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरल्याचे पाहिला मिळाले. अमेरिकेतील सोन्याचे फ्युचर्स 1.2 टक्क्यांनी कमी होऊन प्रति औंस 3350 डॉलरवर आले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये व्यापार करार झाला. तर अमेरिकन डॉलर आणखी मजबूत होईल. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून घेऊ शकतात. कारण, डॉलर मजबूत झाल्यावर सोन्याचे आकर्षण कमी होते आणि त्याचे दर आणखी खाली जाऊ शकतात.
…तर नुकसानीची शक्यताच जास्त
सध्या सोन्याचे भाव थोडे-फार फरकाने कमी झाले आहेत. असे असले तरी, दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे जेव्हा बाजारात सोन्याचे भाव कमी होतात, तेव्हा ती गुंतवणुकीची चांगली संधी मानली पाहिजे. मात्र, प्रत्यक्ष सोनं (ऑफलाईन) खरेदी करणे थोडे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत असाल तर नुकसान होण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर उतरले
भारतीय कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी सोन्याच्या फ्युचर्स दरात मोठी घट झाली. जवळपास ०.४८% नी दर कमी झाला आणि १० ग्रॅम सोन्याचा भाव ९६,६२० रुपयांवर आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भारतात सोन्याची मागणी वाढू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.