'देशात टोलनाके राहणार नाहीत, सरकार आता...'; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा (फोटो सौजन्य- iStock)
नवी दिल्ली : महामार्गावर वाहनाने प्रवास करताना आपल्याला टोल द्यावा लागतो. हे देशातील अनेक भागांत पाहिला मिळते. या टोलनाक्यासंदर्भात वेळोवेळी काही निर्णयही घेतले गेले आहेत. पण, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे’, असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री गडकरी हे दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लवकरच देशभरात नवीन टोल धोरण लागू करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे टोलशी संबंधित समस्या सोडवता येतील. परंतु, अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जर सरकारच्या नवीन धोरणांतर्गत 3000 रुपयांचा फॉर्म्युला लागू केला गेला, तर याचा सर्वात मोठा फायदा त्या लोकांना होईल, जे दर महिन्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांचा वापर करतात. यातच टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्यासाठी फास्टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान, या फास्टॅगसाठी टोलनाक्यांवर गाड्यांना उभं राहावं लागत आहे. देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे. नवीन धोरणात, सरकार लोकांना तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील एक वर्षासाठी कोणत्याही टोल प्लाझावर कर भरावा लागणार नाही.
फास्टॅग नसल्यास दुप्पट टोलची वसुली
येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला. तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.






