अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा (File Photo)
नवी दिल्ली : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच देशातील अनेक भागांत हवामान बदलले आहे. हवामान विभागाने गुरुवारी देशातील 22 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असून तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मैदानी आणि पूर्व भारतातील भागांत वीज कोसळण्यासह गारपीटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्याने मच्छीमार आणि शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौसह अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मेरठ, आग्रा, प्रयागराज, कानपूर येथेही पावसाचा अंदाज आहे. तसेच बिहारच्या पाटणा, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर आणि पूर्णियासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
झारखंड राज्यातील रांची, धनबाद, जमशेदपूर आणि बोकारोसह अनेक जिल्ह्यांत १ आणि २ ऑक्टोबरला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रांचीतील तापमान २९ ते २० अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. राजधानी दिल्लीत मध्यम पाऊस आणि ताशी २० ते ३० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार
सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी देशातील पावसाचा जोर अद्याप ओसरलेला नाही. देशभरात सध्या पाच चक्रीवादळीय परिसंचरण प्रणाली सक्रिय असून, त्यांच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. काही भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नऊ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
वायव्य भागासह पूर्व भारतातील नऊपेक्षा जास्त राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. या भागांत आर्द्रता वाढू शकते. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट






