JDU MP's statement
JDU MP's statement

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

  Trinamool Congress : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल शुक्रवारी (८ डिसेंबर) लोकसभेत मांडण्यात आला. या अहवालात मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली होती. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच मोईत्रा यांनी संसदेकडून दिला जाणारा लॉग-इन आयडी आणि पासवर्डही हिरानंदानी यांना दिला होता.
  मोईत्रा यांची तक्रार
  त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मोईत्रा यांची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे प्रकरण नितीमत्ता समितीकडे पाठवलं होतं.
  बांका मतदारसंघाचे खासदार
  दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्या बचावासाठी वेगवेगळे पक्ष उभे राहिले आहेत. जनता दल युनायटेडचे खासदार गिरधारी यादव यांनीदेखील लोकसभेत यावर भाष्य केले. बिहारच्या बांका मतदारसंघाचे खासदार गिरधारी यादव लोकसभा अध्यक्षांसमोर म्हणाले, माझा पीए (स्वीय सहाय्यक) लोकसभेत प्रश्न विचारतो. माझा प्रश्न मी स्वतः लिहित नाही. हे सगळे काम माझा स्वीय सहाय्यक करतो. गिरधारी यादव यांच्या या वक्तव्यानंतर ओम बिर्ला संतापले आणि त्यांनी यादव यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला.
  माझ्याप्रमाणेच असे अनेक खासदार
  गिरधारी यादव म्हणाले, मला तर माझा पासवर्डसुद्धा आठवत नाही. ते सगळे काम माझ्या स्वीय सहाय्यकाकडे असते. यावेळी मी भीतीपोटी एकही प्रश्न विचारला नाही. कारण मला वाटत होते की, काही विचारले तर काय होईल काही सांगता येत नाही. माझा सहायक माझे प्रश्न विचारतो. मी कधीच माझा प्रश्न बनवत नाही. माझ्याप्रमाणेच असे अनेक खासदार आहेत जे स्वतःचे प्रश्न स्वतः लिहित नाहीत.
  लोकशाहीत आम्हाला घाबरवले
  खासदार यादव म्हणाले, लोकशाहीत आम्हाला घाबरवले जात आहे. मला कॉम्युटर वापरता येत नाही. मी तिसऱ्यांदा खासदार झालोय. त्याआधी चार वेळा आमदार होतो. म्हातारपणी मी हे सगळं शिकू शकतो का? या वयात हे सगळं शिकणं वगैरे मला शक्य नाही. त्यामुळे मी प्रश्नच विचारले नाहीत. आता आम्हाला हे सगळं नाही येत तर नाही येत. सर्वांसाठी वेगवेगळे कायदे कशासाठी? भाजपा मनुस्मृती लागू करण्याच्या प्रयत्नात आहे.