संग्रहित फोटो
पुणे : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्या तसेच तिघांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एका कामगाराला न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. दहा वर्षांपुर्वी घडलेल्या या घटनेत हा निकाल न्यायालयाने दिला आहे. सूसगावातील चाळीत किरकोळ कारणावरून ही घटना घडली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःला मानसिक रुग्ण असल्याचे भासवून बचावाचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पीडित कुटुंबांना न्याय दिला.
मुकिंद शेकू हाते (वय ४१, रा. सूसगाव, मूळ रा. धारापूर, नांदेड) असे शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पृथ्वीराज साळुंखे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हातेने चाकूने केलेल्या हल्ल्यात नंदाबाई कांबळे यांचा मृत्यू झाला होता; तर तक्रारदारांसमवेत त्यांची आई आणि वडील जखमी झाले होते. ही घटना १६ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान सूसगावातील चांदेरे चाळीत घडली होती.
चाळीत तक्रारदार साळुंखे, नंदाबाई कांबळे आणि आरोपी हातेचे कुटुंब शेजारी शेजारी राहायचे. गुन्ह्याच्या आठ दिवस आधी आरोपीने तक्रारदारांची आई व बहिणीला शिविगाळ केली आणि तक्रारदारांना मारहाण केली होती. त्या वेळी झालेल्या भांडणात नंदाबाईंनी मध्यस्थी केली. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातून त्याने नंदाबाई कांबळे यांच्या पोटावर चाकूने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केला. नंदाबाईंना वाचविण्याचा प्रयत्न करणारे तक्रारदारांचे वडील यशवंत आणि आई योगिता यांच्यावरही आरोपीने जीवघेणा हल्ला केला.आरोपीच्या चाकू हल्ल्यात यशवंत यांच्या पोटाचे आतडे बाहेर आले होते. तक्रारदारांनी आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्यावरही वार केले. तपास अधिकारी ए. टी. वाघमाले यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत नंदाबाई कांबळे यांच्या मुलाने नोंदविलेली प्रत्यक्षदर्शी साक्ष, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी नोंदविलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेत त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील जावेद खान यांनी केला. आरोपीने मानसिक रुग्ण असल्याचा बचाव करत पत्नी व मानसोपचार तज्ज्ञाची साक्ष नोंदवली. मात्र, गुन्हा करताना आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली होती याचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. आरोपीने जाणीवपूर्वक पोटासारख्या नाजूक भागावर वार केले, यावरून त्याचा हेतू स्पष्ट होतो, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.






