सौजन्य- X
झारखंड: झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन यांनी राजभवनात झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. हेमंत सोरेन यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन आज संध्याकाळी राजीनामा देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या आमदारांसह राज्यपालांच्या कार्यालयात पोहोचले.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) द्वारे चौकशी करत असलेल्या जमीन व्यवहाराशी संबंधित प्रकरणात हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर चंपाई सोरेन राजीनामा देतील. अशी चर्चा होती ती आज खरी ठरली आहे. राज्यातील पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या आमदारांमध्ये एकमत झाल्यानंतर हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून परत येणार आहेत.
चंपाई सोरेन यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर सांगितले की “झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या निर्णयानुसार मी राजीनामा दिला आहे. आमची युती मजबूत आहे,” ते म्हणाले, “हेमंत सोरेनजींचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आघाडीच्या भागीदारांनी मला जबाबदारी दिली होती. आता हेमंत सोरेन जी यांच्या बाजूने आघाडीने निर्णय घेतला आहे.”
हेमंत सोरेन हे उद्या गुरुवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. राज्यपाल कार्यालयाकडून उद्याच्या शपथविधीच्या वेळेसंबंधी माहिती दिली जाईल. असे राजभवनामध्ये आलेल्या आमदार आणि मंत्र्यांनी सांगितले.
कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २८ जूनला हायकोर्टाने जामीन मंजूर केला. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. हेमंत सोरेन यांनी ३१ जानेवारीला अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लोकसभेच्या निवडणूकीमध्येही त्यांच्याशिवाय झामुमो पक्षाने प्रचार केला. त्यांच्या पत्नी कल्पना मुर्मु सोरेन यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. झारखंडमध्ये हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्षांना आणखी बळ मिळणार आहे.