ज्योती मल्होत्राचे काळे कारनामे समोर; पण अशी अडकली तपास यंत्रणांच्या जाळ्यात
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील पाकिस्तानी अधिकारी दानिशसोबत तिचे घनिष्ठ संबंध होते आणि याच संबंधांच्या आधारे तिला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी वागणूक मिळत होती, अशी माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून तिच्याकडून आणखीही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
ज्योतीच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओंमध्ये तिने एक व्हिडोओ शेअर केला आहे. यात ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवशी (23 मार्च 2024) दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी होताना दिसत आहे. तिथे दानिश नावाचा अधिकारी तिला अत्यंत आपुलकीने स्वागत करताना व्हिडिओमध्ये दिसतो. त्यांच्यातील संवाद हा अगदी ओळखीच्या माणसांसारखा असल्याचेही दिसून येत आहे.
ज्याच्याशी ज्योतीचे संबंध होते, तोच दानिश हा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकारने त्याला अवांछित व्यक्ती घोषित करून 13 मे रोजी देशातून हाकलून दिले आहे. विशेष बाब म्हणजे, पाकिस्तानात झालेल्या पार्टीदरम्यान दानिशने ज्योतीला आपल्या पत्नीचीही ओळख करून दिली व इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांशीही संवाद घडवून आणला. तिने त्याच्या पत्नीला हरियाणातील घरी येण्याचे निमंत्रणही दिले होते.
वीजा प्रक्रियेतून ओळख: ज्योतीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ती पाकिस्तान एक्सप्लोर करण्यासाठी युट्यूबवर चॅनेल चालवत होती आणि वीजासाठी दिल्लीतील पाक दूतावासात गेली होती. तिथेच तिची ओळख पाकिस्तानी अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. पहिल्याच भेटीत त्याने अत्यंत मैत्रीपूर्ण वर्तन करत तिचा फोन नंबरही मिळवला. या भेटीनंतर दोघांमध्येही सातत्याने संपर्क सुरू झाला. 2023 मध्ये 10 दिवसांचा वीजा मिळाल्यानंतर दानिशने तिला पाकिस्तानात अली आहवान या व्यक्तीकडे पाठवले. त्याने तिला ISI अधिकाऱ्यांशी (शाकिर आणि राणा शहबाज) भेट घडवून दिली.
भारत परतल्यानंतर ज्योतीने व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, टेलिग्रामसारख्या अॅप्सच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्यास सुरुवात केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने शाकिरचा नंबर ‘जट रंधावा’ या नावाने सेव्ह केला होता.
पाकिस्तानात गेल्यानंतरही ज्योतीला अत्यंत विशेष वागणूक मिळत होती. ती अनेक उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये सहभागी झाली. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली प्रवास करत होती. अशा प्रवासासाठी सामान्य भारतीय नागरिकांना पोलिसांच्या संमतीशिवाय परवानगी मिळत नाही. पण ज्योतीसाठी नियम अपवाद बनले होते. हिसार पोलिसांकडून घेतलेल्या चौकशीत तिने पाकिस्तानात व्हीआयपी वागणूक मिळाल्याची कबुली दिली आहे. ती नेहमी पाकिस्तानी दूतावासाकडून आमंत्रण मिळाल्यावर इफ्तार किंवा इतर कार्यक्रमांना हजेरी लावायची.






