ज्योती मल्होत्राचा पाय खोलात, पाकिस्तान कनेक्शन उघड; पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
Jyoti Malhotra Pakistan Connection: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिसार पोलिसांनी हे २५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात ज्योतीचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या आरोपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात पाकिस्तानकडून टूलकिटप्रमाणे ज्योतीचा वापर केला जात असल्याचे नमुद कऱण्यात आले आहे.
याशिवाय ज्योती मल्होत्राने भारतातील अनेक गोष्टींची माहिती पाकिस्तानी एजंट्सला शेअर केल्या होत्या. ती सतत त्यांच्या संपर्कात होती. ज्योती तिच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तिथल्या एजंट्सला संपर्क साधायची. ज्योतीच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना अनेक संवेदनशील माहितीही मिळाल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या दानिश अली यांच्यासोबत ज्योती मल्होत्रा सतत संपर्कात होती. पोलिसांना ज्योती आणि दानिश यांच्यातील चॅट्सही सापडले आहेत. ज्योती आयएसआय एजंट्स शकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लन यांच्याशी बोलत असे. ज्योती आणि हसन नावाच्या एजंटमधील चॅट्सही पोलिसांना सापडले आहेत.
यासोबतच, केस डायरीमध्ये ज्योतीच्या सर्व परदेश प्रवासांचाही उल्लेख आहे. ज्योती मल्होत्रा ‘ट्रॅव्हल विथ जिओ’ नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवत होती, तिला पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी अटक केली होती आणि तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात, हरियाणा पोलिसांनी अनेक सोशल मीडिया प्रभावकांना समन्स जारी करून त्यांची चौकशी केली होती. पाकिस्तान उच्चायोगात तैनात असलेले एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांना हेरगिरीच्या आरोपांवरून १३ मे रोजी हद्दपार करण्यात आले. दरम्यान, ज्योती मल्होत्रा यांच्याविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या दौऱ्यामुळे ज्योती संशयाच्या भोवऱ्यात आली. २०२४ मध्ये ज्योती मल्होत्रा २ महिन्यांच्या आत पाकिस्तान आणि नंतर चीनला गेली. येथूनच सुरक्षा यंत्रणांना ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर संशय आला. १७ एप्रिल २०२४ रोजी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली. १५ मे पर्यंत पाकिस्तानात राहिल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर २५ दिवसांनंतर ती १० जून रोजी चीनला गेली आणि जुलैपर्यंत चीनमध्ये राहिली. त्यानंतर ती १० जुलै रोजी काठमांडूला पोहोचली. यापूर्वी ती करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेली होती, जिथे तिने पंजाबचे मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि तिची मुलाखतही घेतली.
हिसार येथील रहिवासी ३३ वर्षीय मल्होत्रा ‘ट्रॅव्हल विथ जिओ’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवत असे. तिला १६ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली. हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली भारताने १३ मे रोजी पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिशला हद्दपार केले होते.