
NDA की इंडिया? आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येणार?
India Today आणि C-Voter यांच्या Mood of the Nation सर्वेक्षणानुसार, आज निवडणूक झाल्यास पुन्हा एकदा NDA सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वेक्षणातील अंदाजानुसार NDA ला 326 जागा, INDIA आघाडीला 185 जागा, तर इतर पक्षांना 32 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास NDA ला 45 टक्के, INDIA आघाडीला 39 टक्के आणि इतर पक्षांना 16 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
आघाड्यांऐवजी स्वतंत्र पक्षांचा विचार केला तर भाजपला 261 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 106 जागा मिळू शकतात. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे.
देशातील सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील आकडेही महत्त्वाचे आहेत. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशात NDA ला 42 टक्के, तर INDIA आघाडीला 40 टक्के मतांचा अंदाज आहे.
जागांच्या बाबतीत मात्र INDIA आघाडीला 41 जागा, तर NDA ला 38 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत NDA पुढे असले तरी जागांच्या बाबतीत INDIA आघाडी वरचढ ठरण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातही NDA ला आघाडी मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात NDA ला 49 टक्के, तर INDIA आघाडीला 43 टक्के मतांचा वाटा मिळू शकतो.
जागांचा विचार केल्यास NDA ला 31 जागा, तर INDIA आघाडीला 17 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबतही नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. ऑगस्ट 2026 च्या आकडेवारीनुसार, 51 टक्के नागरिकांनी मोदींची कामगिरी चांगली असल्याचे सांगितले. 17 टक्के नागरिकांनी कामगिरी सरासरी असल्याचे मत व्यक्त केले, तर 27 टक्के नागरिकांनी कामगिरी खराब असल्याचे सांगितले.
‘राहुल गांधींचे महाराष्ट्रातील रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न थांबवा,’ बावनकुळेंचा काँग्रेसला टोला
या सर्वेक्षणासाठी 1 जुलै ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशातील विविध राज्ये आणि लोकसभा मतदारसंघांमधील 25,184 प्रौढ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. याशिवाय मागील 24 आठवड्यांत घेण्यात आलेल्या 91,795 लोकांच्या मतांचाही आढावा घेण्यात आला. एकूण 1,16,644 नागरिकांच्या मतांच्या आधारे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.