लखनौ येथे फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; सात जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटाचा आवाज ऐकून लोक घराबाहेर पळू लागले. यावेळी स्थानिकांनी कारखान्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. ही घटना गुडंबा पोलिस स्टेशन परिसरातील बेहटा भागात घडली.
लखनौमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू तर पाचजण जखमी झाले आहेत. पोलिस आणि रुग्णवाहिकेलाही याबाबतची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिस, रुग्णवाहिका आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. बचाव पथकाने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
हेदेखील वाचा : Pune crime: ब्रेकअप झाला, प्रियकराने डिलिव्हरी बॉयचा वेष धारण केलं आणि रोखली पिस्तूल; सुदैवाने तरुणी बचावली
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यासोबतच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
रत्नागिरी एमआयडीसीत स्फोट
दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी औद्योगिक परिसर भयंकर स्फोटाने नुकताच हादरला. विनंती केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटात समीर खेडेकर (वय अंदाजे ३५, रा. घाणेखुठ, लोटे) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. समीर खेडेकर हे विनंती केमिकल कंपनीत बॉयलर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. स्फोटानंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर आता लखनौमधील ही घटना समोर आली आहे.