कार्तिकी एकादशीनिमित्त पैठणला भक्तांची मांदियाळी (Photo Credit - X)
पैठण (वा.) संतांचा प्रांत, भक्तीची भूमी आणि वारकरी परंपरेचा साक्षात उत्सव असलेल्या पैठणनगरीत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने रविवार २ नोव्हेंबर रोजी भक्तीचा सागर उसळला होता. पहाटेपासूनच हजारो वारकरी, साधुसंत, महाराज मंडळी आणि भाविकांनी पवित्र गोदावरीत स्नान करून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. या दिवशी संत नामदेव महाराजांची जयंतीही साजरी केली जाते. त्यामुळे पैठण नगरीत दिवसभर हरिनामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. सकाळी नाथ वंशजांनी विजयी पांडुरंगाचा महाअभिषेक करून धार्मिक विधींची सुरुवात केली. त्यानंतर नाथ मंदिराभोवती नगरप्रदक्षिणा काढत भाविकांनी टाळ-मृदुंगांच्या गजरात “राम कृष्ण हरी “च्या जयघोषात हरिनामाचा अखंड सोहळा रंगविला.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या कार्तिकी वारीत महाराष्ट्रभरातील वारकरी दिंड्या आणि फड आपापल्या परंपरेनुसार पायीवारी करत पैठण नगरीत दाखल झाले. दशमीपासूनच वाळवंट, गोदावरी तट, मठ-मंदिरे येथे भजन, कीर्तन आणि भारुडाचे कार्यक्रम सुरू झाले होते. भक्तिमय वातावरणात संत एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांनी “देशात, जगात शांतता लाभो, सर्वांवर नाथकृपा राहो” अशी प्रार्थना केली.
दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, महिला फौजदार जनाबाई सांगळे, उपनिरीक्षक वैभव सारंग, वाहतूक शाखेचे बाळू लोणे, जमादार राजेंद्र दाभाडे, चिडे व समादेशक राजू कोटलवार यांनी वाहतूक व सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. एसटी बस थाब्यावर बस न थांबवल्याने अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागला. तरीही नाथांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये भक्तीचा महासागर उसळला होता. गोदावरी तटावर दिवसभर हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा ताल, फुगड्या, भजनी मंडळे आणि वारकरीच्या हळदी-कुंकवाच्या उत्साहात सत परंपरेचा तो अखंड वारसा पुन्हा एकदा जिवंत झाला.






