सौजन्य - सोशल मिडीया
गडहिंग्लज/ प्रा सुनील देसाई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात मनोमिलन होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक माजी आमदार राजेश पाटील व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थक डॉ. नंदा कुपेकर बाभूळकर पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाल गतीमान झाल्या आहेत. चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील व माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांना शह देण्यासाठी जोर बैठका सुरु झाल्या आहेत.
हलकर्णी ( ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राजेश पाटील यांनी पुरोगामी विचारांच्या नेतेमंडळीना बरोबर घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील, असे सांगत डॉ. नंदा कुपेकर बाभूळकर यांच्या गटाशी जुळवून घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
जिल्हा परिषदेच्या गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील चारपैकी प्रत्येकी दोन जागा राजेश पाटील व डॉ. बाभूळकर या दोघांनी वाटून घ्यायच्या आणि आजऱ्यातील एक जागा मुश्रीफ यांना सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते. भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी विधानसभेला त्यांच्या विरोधात लढलेले दौलत-अथर्वचे प्रमुख व ‘जनसुराज्य’चे मानसिंग खोराटे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विनायक तथा अप्पी पाटील यांना देखील आपल्यासोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दौलत साखर कारखाना कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार पाटील व खोराटे एकत्र आले. या पार्श्वभूमीवर राजेश पाटील व डॉ. बाभूळकर यांनाही एकत्र आल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
राष्ट्रवादीतील फूट शिवाजी पाटलांच्या पथ्थ्यावर
गतवेळच्या निवडणुकीत डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ राजेश पाटील यांच्या गळ्यात पडली. मात्र, निवडणुकीनंतर राजेश पाटील आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला. जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट कायम राहिली. दरम्यान, राज्य पातळीवर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर राजेश पाटील अजित पवार यांच्यासोबत राहिले तर संध्यादेवी कुपेकर शरद पवार यांच्यासोबत राहिल्या. परिणामी, राजेश पाटील व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुक परस्पर विरोधी लढवली. त्याचा फायदा उठवून शिवाजी पाटील आमदार झाले. त्यांना रोखण्यासाठी आता राजेश पाटील, डॉ. बाभूळकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मनाेमीलनासाठी हसन मुश्रीफ यांचा पुढाकार
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज उपविभागातील काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुकांशी चर्चा करून महाविकास आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. माजी आमदार राजेश पाटील व डॉ. बाभूळकर यांना एकत्र आणण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. मात्र राजेश पाटील आणि कुपेकर गटाचे मनोमिलन होणार का? अद्दश्य शक्ति त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करणार? हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.






