नवी दिल्ली – रोडरेजच्या ३४ वर्षे जुन्या एका प्रकरणात १ वर्ष कैदेची शिक्षा भोगत असलेले नवज्योत सिंग सिद्धू वेळेपूर्वीच तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे सरकार त्यांना २६ जानेवारी २०२३ रोजी मुक्त करू शकते. अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच सिद्धूंना पतियाळा तुरुंगात भेटायला गेलेल्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच काही वरिष्ठ काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूंना भेटायला तुरुंगात गेले होते. भेटीनंतर परतलेले एक ज्येष्ठ नेते म्हणाले की त्यांची तुरुंगातील चांगली वर्तणूक पाहता येत्या २६ जानेवारी रोजी त्यांना मुक्त केले जाऊ शकते. गेल्या साडेसहा महिन्यांपासून ते पतियाळा तुरुंगात आहेत. तिथे ते त्यांच्या कोठडीत क्लार्कचे कामही करत आहेत.
रोडरेजच्या ३४ वर्षे जुन्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना १ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली होती. १९८८ मध्ये पंजाबमधील रोडरेजच्या एखा घटनेत सिद्धूंच्या बुक्क्याच्या प्रहाराने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना अहेतूक हत्येतून मुक्त केले होते आणि एक हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र या प्रकरणातील पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना एक वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती.