Odisha Politics: ओडिशा काँग्रेसमध्ये बंडाचा झटका! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या ३ आमदारांचे निलंबन
Cross Voting Odisha : ओडिशामध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. या प्रकरणी ओडिशा काँग्रेसने कारवाई सुरू केली आहे. भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या तीन आमदारांना पक्षाने निलंबित केले आहे. निलंबित आमदारांमध्ये सनखेमुंडीचे रमेश चंद्र जेना, मोहनाचे दशरथी गोमांगो आणि कटकच्या सोफिया फिरदौस यांचा समावेश आहे.
पक्षाच्या सूचना असतानाही या आमदारांनी सोमवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दिलीप राय यांच्या बाजूने मतदान केले. या प्रकरणी ओडिशा काँग्रेसने सोशल मीडियावर , ज्यांनी काँग्रेसशी गद्दारी केली आहे, त्यांनी देशाशी गद्दारी केली. अशी पोस्ट करत वरील आमदारांना निलंबित केलं आहे.
ओडिशा काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रभारी ऑर्बिंद दास म्हणाले की, संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या हिताच्या विरोधात काम केले आणि आता त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व देखील रद्द केले जाईल. त्या दृष्टीने ओडिशा काँग्रेसकडून लवकरच पक्ष अध्यक्षांना नोटीस पाठवली जाणार आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास म्हणाले की, या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांना संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार त्यांना विधानसभेतून काढून टाकण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे हायकमांडने या निर्णयाचे कौतुक केले असून तो आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
ओडिशामध्ये, बीजेडीच्या आठ आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार दत्तेश्वर होता यांचा पराभव झाला. दत्तेश्वर होता यांना बीजेडीने उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. बिहार आणि हरियाणामध्येही अशीच कारवाई केली जाऊ शकते, असा काँग्रेसचा विश्वास आहे. बिहारमध्ये, सहज विजय मिळवूनही विरोधी उमेदवाराचा पराभव झाला.
हरियाणामध्ये काँग्रेसचे उमेदवार करमवीर सिंग बौध जिंकले, पण पक्षाची रणनीती अयशस्वी ठरत असल्याचे दिसत होते. येथे पाच आमदारांनी पक्षापासून फारकत घेऊन क्रॉस-व्होटिंग केले. याशिवाय, चार मते अवैध ठरवण्यात आली. ३७ जागा असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २८ मते मिळाली. हरियाणा आणि बिहारमधील कोणत्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, याची चौकशी पक्ष आता करत आहे.






