Operation Sindoor Martyrs:'ऑपरेशन सिंदूर'मधील सहा शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर 'रोल ऑफ ऑनर'मध्ये समावेश
Operation Sindoor : गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर‘ दरम्यान शहीद झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील सहा जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. या जवानांच्या नावांचा समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’ मध्ये करण्यात आला असून, नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या २०२५ विभागातील ३डी भिंतीवरही त्यांची नावे कोरण्यात आली आहेत.
– लान्स नाईक दिनेश कुमार – ५ फील्ड रेजिमेंट – शहादत : ७ मे
– एव्हिएटर मुद मुरली नायक – ८५१ लाईट रेजिमेंट – शहादत : ९ मे
– सार्जंट सुरेंद्र कुमार (वायुसेना पदक – VM) – ३९ विंग (भारतीय हवाई दल) – शहादत : १० मे
– सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड – शहादत : १० मे
– रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र – VrC) – ४ जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री – शहादत : १० मे
– हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ फील्ड वर्कशॉप कंपनी – शहादत : ६ जून
६ मे २०२५ रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) येथील दहशतवादी तळांवर लक्ष्यित कारवाई केली होती. या मोहिमेदरम्यान जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले होते.
त्यानंतर १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांचे महासंचालक (DGMO) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवली होती.
इंडिया गेटजवळ २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांची नावे या स्मारकावर नोंदविण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील या सहा शहीद जवानांच्या नावांच्या समावेशामुळे ही लष्करी मोहीम राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अधिकृतपणे सन्मानित करण्यात आलेल्या कारवायांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.






