Ex-army chief Manoj Naravane पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;' माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
Ex-army chief Manoj Naravane: ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईचे स्पष्ट राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट होते, तसेच हा संघर्ष कसा आणि केव्हा संपवायचा हे भारताला आधीपासूनच माहीत होते, असे नरवणे यांनी म्हटले आहे.
एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुसंख्य पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले होते. या मोहिमेत किमान १०० दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना मनोज नरवणे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला “शिक्षात्मक, अचूक आणि संतुलित” कारवाई असे संबोधले. “या मोहिमेचे स्पष्ट राजकीय-लष्करी उद्दिष्ट होते. संघर्ष किती काळ चालवायचा आणि तो कधी थांबवायचा हे आम्हाला माहीत होते.युद्ध म्हणजे बॉलीवूड चित्रपट नाही,” असे स्पष्ट शब्दांत म्हटले.
“युद्ध लढणे हे सोपे काम नसते. अनेकदा मला विचारले जाते की ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक का थांबवण्यात आले. पण युद्ध हे चित्रपटासारखे नसते,” असे नरवणे म्हणाले.
शस्त्रसंधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “जेव्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला, तेव्हा आमच्याकडे पुरेशी ताकद होती आणि आम्ही आणखी मोठे नुकसान करू शकलो असतो. मात्र, आम्ही संयम दाखवला. भारताने दाखवलेल्या संयमामुळे देशाचा जागतिक स्तरावरील सन्मान वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
“भारताकडे आता एक जबाबदार आणि स्थिर राष्ट्र म्हणून पाहिले जाते. शांततेचा पुरस्कार करणारा, पण गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यास मागेपुढे न पाहणारा देश, अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे,” असे नरवणे यांनी सांगितले. मनोज नरवणे यांनी डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ या कालावधीत भारतीय लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.






