(Photo - X)
तरुणांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “मी वेदना, डेटा आणि दौलतीची गोष्ट करणार आहे.” देशातील युवकांनी अनेकदा देशाला दिशा दाखवली आहे. त्यांनी भीतीचा सामना केला आणि भीतीला दूर केले, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणींचा उल्लेख केला. कुटुंबांकडून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळते; मात्र हे प्रमाणपत्र नोकरी मिळवून देत नाही, असा दावा त्यांनी केला.
स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर परिणाम होतो. श्रीमंत विद्यार्थ्यांना पेपर विकत घेण्याची संधी मिळते, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन परीक्षार्थींनी मंचावर येऊन आपले अनुभव सांगितले. शिक्षणासाठी पैसा खर्च करूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.
यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. “भाजप वोट चोरी करवाती है,” असा आरोप करत देशातील विविध संस्थांमध्ये आरएसएसशी संबंधित लोकांना स्थान दिले जात असल्याचे ते म्हणाले. भारतातील रोजगाराच्या संधींचे सर्व दरवाजे बंद असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, पटना येथील काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी द्वेष आणि हिंसेच्या माध्यमातून बदल घडवून आणता येणार नाही, असे सांगितले.
“आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून व्यवस्था बदलायची आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे प्रयागराजमधील राहुल गांधींच्या या संवादात युवकांचे प्रश्न, रोजगार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्था हे प्रमुख मुद्दे ठरल्याचे पाहायला मिळाले.






