सौजन्य - X
राजकारण: रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “20 ते 30 वर्षात पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नका,” असा टोला रामदास आठवले यांनी राहुल गांधींना लगावला. आठवले म्हणाले की, आमचे सरकार खूप मजबूत आहे. एनडीएचे 292 खासदार असून 17 अपक्षांपैकी अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीत सरकार खूप मजबूत आहे आणि ते पाच वर्षे टिकेल.
काल राष्ट्रीय जनता दलाच्या 28 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लालूप्रसाद यांनी मोदी सरकार ऑगस्टपनंतर कोसळेल असा खळबळजनक दावा केला होता. त्या दाव्यावर अनेक राजकीय नेते विश्लेषक मत व्यक्त करताना दिसत आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये एनडीएला कमी जागा, आमच्या पक्षाचा समावेश करा फायदा होईल
आठवले म्हणाले की, उत्तप्रदेशमध्ये एनडीए आघाडीला 71 जागा मिळतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना फार कमी जागा मिळाल्या. तेथे एडीएला 400 हून अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यघटना बदलण्याबाबत लोकांमध्ये भ्रम पसरवण्यात येथे सपा आणि काँग्रेसला यश आले.इतर छोट्या पक्षांप्रमाणे आमच्या पक्षाचा उत्तरप्रदेशच्या एनडीएमध्ये समावेश झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल.
महाराष्ट्र विधानसभेत हव्यात आठ ते दहा जागा
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण आता तेथील विरोधी पक्षांना संविधान बदलण्याची भीती पसरवता येणार नाही. आता विकासाचे राजकारण सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात आम्ही भाजपकडे आठ ते दहा जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करणार आहोत. असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर आठवलेंनी भाष्य केले.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये सध्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा एकही आमदार नाही आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्या पक्षाचा आमदार असावा ही आठवलेंची अपेक्षा आहे. महायुतीमध्ये अगोदरच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जागांसदर्भात वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यामुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यात आता रामदास आठवले यांच्या आठ ते दहा जागांच्या मागणीने महायुतीच्या जागावाटपाचा तिढा वाढणार आहे.