अमरावती : भाजपकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे राजकीय फायद्यासाठी भांडवल केले जात आहे. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले आहे. परंतु, भाजपला घाई झाली असून, उद्घाटनाचा ‘इव्हेंट’ केला जात असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेस भवनात अमरावती विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. चेन्नीथला म्हणाले, काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या विरोधात नाही. सर्वांना आपले धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेतेही अयोध्येला जाऊन आले आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. अयोध्येला ज्यांना जायचे आहे त्याला भारत न्याय यात्रा निवडणुकीचा अजेंडा नाही.
भारत जोडो न्याय यात्रेविषयी बोलताना चेन्नीयला म्हणाले, राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई यात्रा सुरू केली आहे. या न्याय यात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. ही निवडणूक यात्रा नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून सर्व नेते एकत्र आहेत कोणाही पक्ष सोडून जाणार नाही. भाजप अफवा पसरवून दिशाभूल करत आहे. काँग्रेस पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठा यावर चालते.