नवी दिल्ली : सत्य घटनेवर आधारित ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ (Dancing on the Grave) या वेब सीरिजची सध्या चर्चा सुरु आहे. 21 एप्रिल रोजी रीलिज झालेल्या या वेबसीरिजमध्ये श्रीमंत असलेल्या शकीरा खलील (Shakira Khalil) हिची कहाणी सांगण्यात आलीय. तिचा नोकर श्रद्धानंद याच्यावर तिनं केलेलं प्रेम, त्यानंतर तिचं अचानक बेपत्ता होणं आणि तिची हत्या हा सगळा घटनाक्रम दाखवण्यात आलेला आहे. 4 भागात असलेली ही वेब सीरिज भारतासह 250 देशांत एकाच वेळी रिलीज करण्यात आलीय. दिग्दर्शक पैट्रिक ग्राहम यांनीच यांची पटकथी लिहिलेली आहे.
सत्यघटनेवर आधारित असलेल्या या वेब सीरिजमध्ये शकीराच्या हत्येचा आरोपी असलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या श्रद्धानंदला पॅरोलवर सोडण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण आहे तरी काय
म्हैसूरच्या दिवाणाची मुलगी शकिरा खलीली
म्हैसूर राजघराण्याचे दिवाणांची मुलगी आणि सर मिर्जा इस्माइल यांची नात शकिरा खलीली खूप सुंदर आणि स्टायलीश होती. राजेशाही पद्धतीचं तिचं राहणीमान होतं. शकिराचा विवाह लहान वयातच आयएएस अधिकारी अकबर मिर्जा खलीली यांच्याशी झाला होता. अकबर हे ऑस्ट्रिलियात भारताचे उच्चायुक्त होते आणि दमदार व्यक्तिमत्त्वानं संपन्न होते. या दोघांच्या विवाहाला 25 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या दोघांना 4 मुलीही होत्या. आयुष्य सुखासमाधानात चाललं होतं. मात्र शकिरा या सगळ्यात मनातून नाखूश होती.
मुरलीवर फिदा झाली शकिरा
लग्नाच्या 25 वर्षांनंतर शकिराचं जगणं बदललं. एका पार्टीत मुरली मनोबर मिश्रा नावाच्या व्यक्तीशी तिचा परिचय झाला आणि तिचं जगणं पालटलं. शकिरानं अकबर खलिली यांना घटस्फोट दिला आणि 1986 साली मुरली मनोहर मिश्रा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर मुरली मनोबर मिश्रा यानंही आपलं नाव बदलून श्रद्धानंद असं केलं.
एक दिवस शकिरा अचानक झाली गायब
एप्रिल 1991 साली लग्नाच्या 4 वर्षांनंतर शकिरा अचानक बेपत्ता झाली. तिचा दुसरा पती श्रद्धानंद यानं शकिराची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी तिला जिवंत गाडलं. सुरुवातीला श्रद्धानंदनं तिला चहातून झोपेचं औषध दिलं. शकिरा बेशुद्ध झाल्यानंतर तिला घेून तो बंगळुरुत असलेल्या बंगल्यात गेला. एका शवपेटीत तिला बेशुद्धावस्थेत झोपवलं आणि बंगल्याच्या बाहेर असलेल्या अंगणात ही शवपेटी पुरली. शकिराशी संपर्क होत नसल्यानं शकिराची मुलगी मुंबईतून बंगळुरुमध्ये आली. तिनं श्रद्धानंदकडे शकिरा कुठं आहे अशी विचारणा केली. त्यावत शकिरा गर्भवती असून ती उपचारासाठी अमेरिकेत रुझवेल्ट हॉस्पिटलमध्ये गेल्याचं श्रद्धानंदनं सांगितलं.
अमेरिकेत शकिरा सापडेना
जेव्हा या मुलीनं आईची माहिती घेण्यासाठी अमेरिकेत संपर्क केला. तिथंही शकिराचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिनं आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. राजघराण्याशी संबंधित प्रकरणं असल्यानं पोलिसांनीही तातडीनं तपास सुरु केला. मात्र सकिराचा पत्ता लागू शकला नाही. अखेरीस ही केस बंद करण्याची वेळ पोलिसांवर येऊन ठेपली. मात्र 3 वर्षांनंतर असं काही घडलं की त्यामुळं पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहचू शकले.
श्रद्धानंदच्या दारुड्या नोकरानं उघडकीस आला प्रकार
पोलिसांचा पहिला संशय या प्रकरणात श्रद्धानंद याच्यावरच होता. त्याची चौकशीही याबाबत करण्यात आली. मात्र त्याचा सामाजिक दर्जा पाहता पोलीस त्याची थर्ड डिग्री चौकशी करु शकत नव्हते. मात्र एप्रिल 1994 साली असं काही घडलं की या प्रकरणाचा उलगडा झाला.
बंगळुरुचा क्राईम ब्रँचचा पोलीस एका दारुच्या ठेक्यावर बसला होता. त्यावेळी मद्यधुंद अवस्थएतील एक व्यक्ती त्या ठिकाणी आला. ज्या शकिराला पोलीस शोधतायेत, ती जिवंतच नसल्याचा दावा तो या पोलिसासमोर करु लागला. पोलिसांनी त्याला कस्टडीत घेऊन त्याची चौकशी केली. ही व्यक्ती श्रद्धानंदचा नोकर होता. त्याने घडलेला प्रकार सांगिततला. श्रद्धानंदनं शकिराला जिवंत शवपेटीत गाडल्याचं त्यानं कबूल केलं. त्यानंतर श्रद्धानंदची चौकशी करण्यात आली. दोन फटके खाल्ल्यानंतर त्यानंही गुन्ह्याची कबुली दिली.
बंगल्यात जमीन खोदून बाहेर काढला मृतदेह
शकिराची 600 कोटींची संपत्ती हडपण्यासाठी श्रद्धानंदनं हा सगळा प्रकार केला. मे 1991 मध्ये शकिराला गाडण्यात आलं होतं. त्यानंतर 30 एप्रिल 1994 रोजी श्रद्धानंदला अटक करण्यात आली आणि शकिराचा मृतदेह बंगल्याच्या आवारातून पुन्हा उकरुन बाहेर काढण्यात आला. 2000 साली श्रद्धानंदला कनिष्ठ कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. 2005 साली कर्नाटक हायकोर्टानं हीच शिक्षा कायम ठेवली. 2008 साली सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.