पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी अंगलट; आम आदमी पक्षाला कारणे दाखवा नोटीस

निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला (AAP) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात (PM Modi) कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला (AAP) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात (PM Modi) कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाला 16 नोव्हेंबरपर्यंत आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपावर उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘आप’च्या नॅशनल कॉन्फरन्सला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपचे राष्ट्रीय निमंत्रक आहेत. निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की, निर्धारित वेळेत उत्तर न मिळाल्यास या प्रकरणी तुमचे काहीही म्हणणे नाही, असे मानले जाईल. याप्रकरणी निवडणूक आयोग योग्य ती कारवाई किंवा निर्णय घेईल. 10 नोव्हेंबरला भाजपाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अस्वीकार्य आणि अनैतिक व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याबद्दल आपविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

    प्रियंका गांधी यांनाही नोटीस

    काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधात वक्तव्य करण्याशी संबंधित आहे. प्रियंका यांनी नुकतेच एका रॅलीदरम्यान वक्तव्य केले होते.