सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण/अतिश मेटे : चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रत्नागिरी व देवगड येथील हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. उत्पादनात घट होऊनही बाजारभाव तेजीत कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा हापूस आंब्यांचे दर ८०० ते १२०० रुपये प्रति डझन दरम्यान स्थिरावले आहेत. आंब्याला ग्राहकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. हापूस आंब्यांसोबतच लालबाग, केशर, बदाम, दशेरी आदी विविध जातींचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. फळबाजार गजबजलेला दिसत आहे. यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितेमुळे आंबा उत्पादकांसमोर मोठी आव्हान ठरले आहेत. फुलोऱ्याच्या काळात पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान आणि आर्द्रतेतील बदलामुळे आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाली, तर काही भागात फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी, दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन लक्षणीयरीत्या घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.
निर्यात मर्यादा, स्थानिक बाजारावर परिणाम
पूर्वी मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होणारा हापूस यंदा विविध कारणांमुळे देशांतर्गत बाजारातच अधिक प्रमाणात विक्रीस येत आहे. काही देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे निर्यात कमी झाली. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठांवर झाला आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढली. तरी उत्पादन घटल्याने दरांवर फारसा दबाव आलेला नाही.
गुणवत्तेनुसार दरात फरक
व्यापाऱ्यांच्या मते, आंब्याच्या गुणवत्तेनुसार दरात मोठा फरक पडत आहे. आकर्षक रंग, सुगंध आणि चव असलेला देवगड व रत्नागिरी हापूस ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे. दर्जेदार आंब्यासाठी ग्राहक अधिक दर मोजण्यास तयार असल्याचे चित्र आहे.
व्यापाऱ्यांची भूमिका
आंबा व्यापारी शहजाद बागवान यांनी सांगितले की, “यंदा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तेनुसार विक्री होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभाव अधिक असल्याचे दिसून येत आहे.”
आगामी स्थिती काय?
आगामी काही आठवड्यांत आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, उत्पादनाची एकूण स्थिती आणि निर्यातीतील बदल यावरच बाजारभावाचा पुढील कल अवलंबून राहणार आहे. सध्या तरी चाकण बाजार समितीत आंब्यांच्या गोडीने आणि ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ बहरलेली दिसत आहे.






