नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी होणार आहे.
सर्व बंडखोर आमदार उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकूण 9 आमदार उपस्थित आहेत. भाजप बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केला आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार राजिंदर राणा, इंदर दत्त लखनपाल, सुधीर शर्मा, देविंदर कुमार भुट्टू, रवींद्र ठाकूर आणि चैतन्य शर्मा यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करून भाजपच्या बाजूने मतदान केले होते. त्यावर विधानसभाध्यक्षांनी कारवाई करून त्यांना अपात्र ठरवले.
याप्रकरणी सर्व आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली घेतली आहे. विशेष म्हणजे या आमदारांसोबत तीन अपक्ष आमदारही आहेत. आमदार होशियार सिंह, केएल ठाकूर आणि आशी शर्मा हे देखील त्यांच्यासोबत आहेत.
मुख्यमंत्री सुक्खू यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री सुक्खू यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे. सीएम सुक्खू म्हणाले की, बंडखोर आमदारांनी पक्ष आणि त्यांच्या भागातील लोकांचा विश्वास तोडला आहे. या आमदारांनी विवेकाचा आवाज ऐकला नाही. या बंडखोर आमदारांसाठी भाजपने चार्टर्ड विमान पाठवल्याचा आरोप त्यांनी केला.






